लातूर (दैलाप्रप्र) : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून लातूर पोलिस विभागाने जोरदार तयारी आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात पोलीस ठाणे स्तरावर मोठ्या फौजफाट्यासह दिनांक 30/10/2024 रोजी रूट मार्च काढण्यात आला. सोबतच ठिकठिकाणी बैठकाही घेतल्या.
गुन्हेगार आणि असामाजिकतत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलिस अनेक उपाययोजना करत आहेत. संपूर्ण लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये पोलीस ठाणे स्तरावरील महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे नेतृत्वात केंद्रीय पोलीस दलाचे जवान, होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे जवान, व पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी अमलदार यांचा समावेश होता.
"कायदा सुव्यवस्थेचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे, कोणतीही व्यक्ती जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जर कोणी इसम सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उलंघन होणार नाही याची दक्षता घेत आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.