लातूर, दि. १३ : इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या ९८९००८४१६८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गॅस पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील गॅस एजन्सींच्या साठा तपासणीसाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी १० विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके जिल्ह्यातील गॅस एजन्सीला, गॅस गोडावूनला 'सरप्राईज व्हिजिट' देऊन गॅस सिलेंडर साठ्याची तपासणी करतील. तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई करतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारकांची बैठक घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व घरगुती ग्राहकांना प्राधान्याने सिलेंडर पुरवठा करावा. एका कनेक्शन धारकाला २५ दिवसांच्या आत दुसरे सिलेंडर दिले जाऊ नये. तसेच, वितरण केवळ फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ आणि ओटीपी आधारित करावे. गॅस कंपनीने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम आकारू नये. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्यास किंवा काळाबाजार केल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. एजन्सीधारकांनी दररोजचा साठा प्रशासनाला सादर करणे अनिवार्य आहे. स्टॉक असतानाही हेतुपुरस्सर डिलिव्हरी न केल्यास कडक कारवाई होईल. सर्व गॅस एजन्सी नियमित वेळेनुसार उघड्या ठेवाव्यात, विनाकारण एजन्सी बंद ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
*****