ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

       
      लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजूर सर्वांनी मिळून साखर उद्योगातील आव्हानांना तोंड द्यावे.ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी प्रत्येकाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथालातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे .
      ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी  लातूर शहरातील हॉटेल वैष्णव येथे सर्व युनिटच्या कर्मचाऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद आणि हार्वेस्टर मशीन प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला ट्वेंटीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख,ऊस तज्ञ सुरेश माने पाटील विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील,जनरल मॅनेजर संतोष बिराजदार,तसेच श्री.सुभाष पाटील, श्री. सुभाष सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की "विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांत ऊस क्षेत्रात मोठे काम झाले. विकासरत्न विलासराव देशमुख ‘मांजरा’ साखर कारखान्याने देशात पहिल्यांदाच १०० टक्के हार्वेस्टरने ऊसतोड केली आहे. या उपक्रमाचे श्रेय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना जाते. हार्वेस्टरकर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले तर त्यांना कायम नोकरीत सामावून घेऊ.जगातजे झाले नाही ते आपण लातूरमध्ये करून दाखवू,” असेही त्यांनी नमूद केले.
     यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस तज्ञ सुरेश माने पाटील यांनी ऊस जातींची ओळख, लागवड, खोडवा व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, तसेच पाणी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी नोंदणी, ऊस बियाणे व्यवस्थापन, अंतर मशागत, ऊस तोडणी आदी विषयांवर माहिती दिली.तर न्यू हॉलंड हार्वेस्टर कंपनीचे सुवर्णसिंग पाटील व सागर कदम यांनी मशीनविषयक
प्रशिक्षण दिले.
     कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. हार्वेस्टर ऑपरेटर व चालकांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच गेल्या गळीत हंगामात सर्वाधिक तोडणी व वाहतूक करणाऱ्या हार्वेस्टर व्यवस्थापक, ऑपरेटर आणि
चालकांचा सत्कारही करण्यात आला.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी आभार एस.आर.केळकर यांनी मानले.

*लातूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला..*

      लातूर (पोअका) : लातूर तालुक्यातील एका गावात होत असलेला बालविवाह लातूर पोलिसांनी सतर्कता दाखवत मुला-मुलीच्या आई वडिलांचे प्रबोधन करुन रोखला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वर फोन करून एका नागरिकांने लातूर तालुक्यातील 12 नंबर परिसरात बालविवाह होणार असल्यासंदर्भात माहिती लातूर पोलिसांना दिली. त्यावरून डायल 112 येथील कार्यरत पोलीस अधिकारी/अमलदारांनी तत्परतेने कारवाई करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरची माहिती दामिनी व भरोसा सेल च्या पथकाला दिली. त्यावरून भरोसा सेलचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व त्यांच्या पथकाने वेळेत सदर ठिकाणी पोहोचून होणारा बालविवाह थांबविला तसेच बालविवाह लावणाऱ्या पालकांना नोटीसा देऊन बालकल्याण समिती समोर हजर राहणे संदर्भात समज दिली आहे.
      सजग नागरिकांने डायल 112 वर दिलेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांच्या भरोसा सेल व दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख,  डायल 112 युनिटचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ ढोले, पोलीस अंमलदार, नितीन कोतवाड, चिंतामणी पाचपुते,चित्रा कुंभार, शंकर बुड्डे, चालक पल्लवी चिलगर  तसेच सोबत चाइल्ड लाइन चे बापू सूर्यवंशी यांनी अतिशय तत्परतेने कारवाई करून वेळीच बालविवाह रोखला आहे.

*स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

       लातूर ( जिमाका), दि. 12 : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल.
       या कार्यक्रमाला सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. इतर सर्व कार्यालये, संस्था यांना ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास, त्यांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 पूर्वी किंवा सकाळी 9.35 वाजल्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

*लातूर शहरात फ्रंटशिट घेणाऱ्या व गणवेष परिधान न करणाऱ्या बेशिस्त ऑटोरिक्षा चालका विरूध्द विशेष मोहिम.*

       लातूर  : शहरात ऑटो रिक्षाची  संख्या जास्त असुन त्यात ऑटोरिक्षा चालक सर्रासपणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. रिक्षामध्ये चालकाचे बाजुस फ्रंटशिटला प्रवासी घेणे, गणवेष परिधान न करणे, शहरात रोडवर बेशिस्त पणे कोठेही थांबून प्रवासी चढ-उतार करणे, चौका-चौकांमध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी ऑटो रिक्षाची दुहेरी रांग करुन थांबवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारीस अडचण निर्माण होवून त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने, फ्रंटशिट घेण्याऱ्या, गणवेश परिधान न करणाऱ्या, अशा बेशिस्त ऑटो चालकावर मोटार वाहन अधिनियमान्वये कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक,मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी,  (लातूर शहर) रणजीत सावंत, यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांचे नेतृत्वात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे यात
1) बेशिस्त पणे फ्रंटशिट घेणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर दररोज 20-25 केसेस केल्या जात असुन त्यांचेकडून फ्रंटशिटचे दंडासह मागील संपुर्ण अनपेड दंड जमा करून घेण्यात येत आहे.
2) गणवेष परिधान न करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवरही कडक कार्यवाही चालू असून 368 ऑटो चालकावर केसेस करण्यात आल्या असुन 3,30,300/-रुपये दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही मोहिम चालू आहे.
३) पेट्रोल ऑटोरिक्षामध्ये अनाधिकृतपणे बदल करुन विना परवाना एलपीजी किट बसवणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले असुन यापुढे विना परवाना एलपीजी किट बसविणारे ऑटोरिक्षावर विशेष मोहिम राबवून गुन्हे दाखल येणार आहेत
ऑटो रिक्षा मध्ये फ्रंटशिट प्रवासी घेण्यावर, गणवेष परिधान न करणारेवर, विना परवाना एलपीजी किट बसविणारेवर, चौकामध्ये 50 मिटर अंतराचे आत थांबणारेवर व कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ-उतार करणारेवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडून कडक कार्यवाही करण्याची मोहिम चालू असुन लातूर शहरातील सर्व ऑटो रिक्षा मालक व चालक यांनी 1) फ्रंटशिट प्रवासी घेवू नये 2) गणवेष परिधान करावा 3) ऑटो रिक्षा थांब्यावरच शिस्तीत थांबून प्रवासी चढ-उतार करावेत 4) मुख्य चौकांमध्ये 50 मिटर आत नो स्टॉपिंग/नो पार्किंगचे पालन करण्याबाबत लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस अवाहन करण्यात येत आहे.  नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांना  दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागणार आहे.

*लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*

         लातूर, दि. 8 (जिमाका) :  कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 9 जुलै, 2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  23 जुलै, 2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. 
शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी  कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस  किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी द्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
***

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा - भिक्खू पय्यानंद थेरो

      
      लातूर  : राजकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे खरे अर्थाने भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते. महाराष्ट्राच्या मातीत ज्या थोर पुरुषांनी सामाजिक समतेचा आणि न्यायाचा दीप प्रज्वलित केला, त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते राजर्षी शाहू महाराज यांचे. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचले. त्यांच्याच कार्याला उजाळा देत भिक्खू पय्यानंद थेरो यांनी लातूरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त  झालेल्या भव्य कार्यक्रमात ठामपणे मागणी केली की, “राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात यावे.”
       आजच्या दिवशी लातूर शहर साक्षीदार ठरले एका वैचारिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या मिरवणुकीचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या भव्य दिव्य मिरवणुकीने समतेचा झेंडा हाती घेतला होता. ज्येष्ठ नागरिक विचार मंच आणि शाक्य सिंह माता भिमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.
       मिरवणूकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि त्रिसरण-पंचशीलने झाली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. 
भिक्खू पय्यानंद थेरो पुढे बोलताना म्हणाले की, “शाहू महाराज हे केवळ एक शासक नव्हते, तर ते समाजमनाचे शिल्पकार होते. १९०२ मध्ये ५०% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून त्यांनी मोफत शिक्षण, विद्यार्थी वसतीगृहे, रुग्णालये आणि सामाजिक संस्थांची उभारणी केली.”
        “आज भारतात अनेकांना भारतरत्न मिळाले, पण ज्यांनी लाखो-कोटींच्या जीवनात उजेड आणला अशा शाहू महाराजांचा अद्याप गौरव झालेला नाही. म्हणूनच आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा.”
तसेच, त्यांनी सुचवले की शाहू महाराजांची जयंती ही फक्त एक साजरी करणारी तारीख न राहता, सामाजिक प्रेरणेचा दिवस व्हावा. यासाठी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम केवळ एक मिरवणूक नव्हती, ती होती इतिहासाच्या न्यायासाठीचा जागर. लोकशाही, समता, शिक्षण, आरक्षण यांसाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले त्या शाहू महाराजांच्या स्मृतींना एक सामूहिक वंदना होती.
       या प्रसंगी केशव कांबळे, सूर्यभान लातूर कर, त्र्यंबक कवठेकर, मोहन सोनकांबळे, राहुल शाक्यमुनी, मिलिंद धावारे ई. सह धम्म सेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

*लामजना परिसरामध्ये रोडवर वयोवृद्धाला लुटणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासात मुद्दमालसह अटक. पोलीस ठाणे किल्लारीची कारवाई.*

       
       लातूर (पोअका) : 80 वर्षीय वृद्ध इसमाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या चोरणाऱ्या अनोळखी गुन्हेगारांना अवघ्या चार तासात निष्पन्न करून गुन्ह्यातील सोन्याची अंगठी व गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल असे 80,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीची कामगिरी. दिनांक 14/06/2025 रोजी दुपारी 12:,30 वाजता पोलीस ठाणे किल्लारी हद्दीतील लामजना शिवारातील रोड वरून जाणाऱ्या एका 84 वर्षीय वृद्धाला "तू आमच्या अंगावर का थुकलास"असे म्हणून मारहाण करून त्याच्या जवळील 15 हजार रुपये रोख रक्कम व हातातील अंगठ्या अज्ञात तीन आरोपींनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे किल्लारी येथे अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांनी तात्काळ अधिकारी/अमलदारांचे पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान नमूद  पोलीस तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वयोवृद्धास मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे अंगठ्या  चोरलेल्या तीन आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी  सदरचा गुन्हा कबूल करून रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाला मारहाण करून बळजबरीने, त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेऊन पळून गेल्याचे सांगितले.त्यांचेकडून सोन्याची अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असे एकूण 80,000/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.1) वसीम रजाक शेख, वय 21 वर्ष, राहणार शिंदगाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर. 2) इम्रान महताब शेख, वय 24 वर्ष, राहणार शिंदगाव तालुका रेनापुर. जिल्हा लातूर. 3)कौरव जनक लहाडे, वय 41 वर्ष, राहणार पाखरसांगवी, तालुका जिल्हा लातूर. असे असून नमूद गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.
      कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिंदे, ढोणे, पोलीस अंमलदार गणेश यादव, दत्ता जाधव, बालाजी लटुरे, सोमवंशी, रवी करके, आबा इंगळे यांनी केली केली असून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या चार तासात निष्पन्न करून ताब्यात घेतले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या